नवी मुंबई : उलवे भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या शेजारी राहणाऱ्या साडेसात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संदेश पाटील (४०) असे या व्यक्तीचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्कारासह पॉक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
या घटनेतील अटक आरोपी संदेश पाटील हा उलवे भागात राहण्यास असून त्याने अत्याचार केलेली साडेसात वर्षांची मुलगी त्याच्या शेजारी राहण्यास आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी संदेश पाटील याच्या घरामध्ये बुद्धिबळ खेळण्यासाठी गेली असताना आरोपी संदेश पाटील याने पीडित मलीला आपल्या बेडरूममध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील व लैंगिक चाळे केले. त्यानंतर त्याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर पीडित मुलीने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या आईने तत्काळ एनआरआय पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संदेश पाटील याला अटक केली आहे. दरम्यान, या नराधमाने दोन वर्षांपूर्वी देखील घरामध्ये कुणीही नसताना पीडित मुलीला बोलावून तिला मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यासोबत लैंगिक चाळे केल्याचे उघडकीस आले आहे.