छत्रपती संभाजीनगर : मित्रांसोबत गेलेल्या एका १६ वर्षीय युवकाचा हर्मूल तलावात बुडून मृत्यू झाला. २९ एप्रिलला सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी हसूल ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. युसूफ अमीद खान (१६, रा. मिसारवाडी) असे मृताचे नाव आहे. युसूफ व त्याचे तीन मित्र हे दुचाकीने हसूल परिसरात फिरण्यासाठी गेले. तिकडे गेल्यावर त्यांना हर्मूल तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. ते सर्वजण तलावात उतरले. तलावातील पाणी बरेच कमी झालेले आहे, त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. पाण्यात उतरलेला युसूफ अचानक खोल खड्ड्यात ओढला गेला. त्यात त्याचा बुडून मृत्यू झाला. ही माहिती मिळताच सिडको अग्निशामक विभागातील ड्यूटी इन्चार्ज एस. एस. कुलकर्णी, एस. ई. भोसले, जवान वेलदोडे, योगेश दूधे, अब्दुल वासे, अमीर शेख आणि अब्दुल हमीद यांनी तत्काळ तलावाकडे धाव घेतली. काही वेळ शोध मोहीम राबवून युसूफ खानचा मृतदेह शोधून बाहेर काढला.