पिंपरी : चऱ्होली खुर्द येथे कौटुंबिक कारणावरुन मोठ्या भावाने लहान भावाचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर पुरावा नष्ट करुन आत्महत्या असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हुजूर महंमुद सैय्यद (वय-३२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. २८) रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास चऱ्होली खुर्द येथे घडली आहे.
याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात हुजूर याची पत्नी आणि त्याच्या मोठ्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मयत हुजुर याची पत्नी मदिना हुजुर सय्यद (वय-२८ रा. थोरवे वस्ती चऱ्होली खु., मुळ रा. मु.पो. मासाला खु., ता. तुळजापूर, जि. धाराशिव), मोठा भाऊ फिरोज महंमुद सैय्यद (वय-३८ रा. मु.पो. मासाला खु., ता. तुळजापूर, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल करुन अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक ए.पी. लोहार यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली खु. येथील थोरवे वस्तीमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक ए.पी. लोहार यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे फिर्यादी व त्यांचे सहकारी घटनास्थळी गेले. त्यावेळी मयत हुजूर सय्यद याच्या पत्नीने सांगितले की, त्यांच्या पतीने स्वत: धडक घेऊन आत्महत्या केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला त्यावेळी मृतदेहावर असलेल्या जखमा, घटनास्थळावरील परिस्थिती, मयत व्यक्तीची स्थिती आणि मुलांनी सांगितलेल्या माहितीवरुन हुजूर सय्यद याने आत्महत्या केली नसल्याचे निष्पन्न झाले.
हुजूर सैय्यद यांच्यावर धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याचे आढळून आले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी मदिना हिने घटनास्थळावरील रक्त पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपींकडे चौकशी सुरु असून प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणावरुन आरोपींनी हुजूर सैय्यद याचा धारदार हत्याराने वार करुन खून केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी मुलीचा जबाब घेऊन हुजुर सैय्यद याची पत्नी मदिना सैय्यद व मोठा भाऊ फिरोज सैय्यद यांना अटक केली असून तपास सुरु असल्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राहुल साळी यांनी सांगितले.