पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune Railway Station) परिसरातून दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री आईवडिलांसह झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले होते. या बालकाची बंडगार्डन पोलिसानी (Bundgarden Police) कर्नाटक येथे कारवाई करुन त्या अपहरण करणा-याला अटक केली आहे.
चंद्रशेखर मालकाप्पा नलूगंडी (वय 24, रा. जांबगी, जि. विजापूर, कर्नाटक), सुभाष पुत्तप्पा कांबळे (वय 55, रा. लवंगी, दक्षिण सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. अपहरण झालेल्या बालकाचे नाव श्रावण अजय तेलंग असे आहे. याप्रकरणी त्याचे वडील अजय तेलंग बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली होती.
यावेळी बंडगार्डन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचे भुसावळचे असलेले हे दाम्पत्य नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्यात आले होते. फिर्यादी यांची सासू पुण्यात राहते. शनिवारी मध्यरात्री पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात तेलंग दाम्पत्य मुलासह झोपले होते. तेव्हा चोरट्याने त्यांचे बाळ उचलून नेले. तेलंग दाम्पत्यांस जाग आल्यावर त्यांना बाळ दिसले नाही. बाळाच्या आईवडिंलांनी परिसरात बाळाचा शोध घेतला मात्र, त्याचा शोध लागला नव्हता.