नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदिक फार्मा या कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पतंजली आयुर्वेदिक फार्मा कंपनीच्या तब्बल १४ औषध विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने ही कारवाई केली आहे. उत्तराखंड सरकारने सोमवारी (ता. २९) संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे.
त्यामध्ये असं म्हटल आहे की, “पतंजली आयुर्वेदाच्या उत्पादनांबाबत वारंवार दिशाभूल करणारी जाहिराती प्रसिद्ध केल्यामुळे आम्ही कंपनीच्या १४ औषधांवर बंदी घातली आहे.”
या १४ औषधांवर बंदी
पतंजली आयुर्वेदाच्या बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये श्वासारि गोल्ड, श्वासारि वटी, दिव्य ब्रोंकोम, श्वासारि प्रवाही, श्वासारि अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पावर, लिवामृत एडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे.
या १४ औषधांचे उत्पादन थांबवण्याचे आदेश उत्तराखंड सरकारने दिले आहेत. एवढंच नाही, तर या औषधांचा परवाना देखील सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. तसा आदेशही सर्व जिल्हा औषध निरीक्षकांना पाठवण्यात आला आहे. याशिवाय केंद्रीय आयुष मंत्रालयालाही ही माहिती देण्यात आली आहे.
पतंजलीला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
गेल्या काही दिवसापूर्वीच सुप्रीम कोर्टानं देखील पंतजलीचे मालक बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना फटकारलं होतं. पतंजलीकडून दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिराती केल्या जात आहेत, असं सांगत कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी तातडीने माफी मागा असे आदेशही कोर्टाने बाबा रामदेव यांना दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर पतंजलीने दोन वेळा वृत्तपत्रांमध्ये माफीनाम्याची जाहीरात दिली होती. त्यामध्ये न्यायालयाचा आम्ही आदर करत असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पतंजली ही चूक पुन्हा करणार नसल्याच नमूद केलं होतं.