राळेगाव (यवतमाळ): पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या स्कूल बसला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास बरडगावनजीक घडली.
श्रावणी गजानन भोयर (१२), परी गजानन भोयर (१०), लीलाबाई पातूरकर (४२), नीलेश चाफेकर (४०) अशी मृतांची नावे आहेत. यवतमाळ येथील लग्नकार्य आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिसेप्शनसाठी राळेगाव तालुक्यातील खैरी येथील ताजने यांच्या घरी वऱ्हाड आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर स्कूल बसने वऱ्हाडी परत जात होते. दरम्यान, स्कूल बसचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे चालकाने बस थांबवून स्टेपनी बदलण्याची प्रक्रिया सुरू केली. याचवेळी भरधाव वेगातील आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर इतर १० जण जखमी झाले.