पुणे : चेष्टा मस्करीतून एकाच्या पायावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सहकार नगर परिसरात घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा पाय होरपळला आहे. तर दोघांच्या विरोधात सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापू जालिंदर खिलारे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. खिलारे यांनी याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम पवार आणि मयूर भुंबे (रा.सहकारनगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खिलारे व आरोपी पवार, भुंबे हे एकाच वसाहतीत राहायला आहेत. खिलारे कामावरुन घरी निघाले होते. त्यावेळी वसाहतातील एका मुलाच्या दुचाकीच्या टाकीत पाणी शिरले होते. खिलारे हे दुचाकी आडवी करुन टाकीतील पाणी काढत होते. खिलारे यांनी टाकीतील पेट्रोल बाटलीत काढून ठेवले होते.
दरम्यान, खिलारे यांच्या शेजारी थांबलेले आरोपी पवार आणि भुंबे यांनी चेष्टामस्करीत बाटलीतील पेट्रोल पायाजवळ शिंपडले आणि जळती काडीपेटी टाकली. भडका झाल्याने खिलारे यांचा पाय होरपळला असून, शेजाऱ्यांनी पायावर चादर टाकल्याने तरुण बचावला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.