पुणे : शहरातील माजी महापौर मोहनसिंग राजपाल (Mohan Singh Rajpal) यांचे शनिवारी (दि.२७) दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून मोहनसिंग राजपाल आजारी होते. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्याचे पहिले शिख महापौर म्हणून राजपालांची ओळख होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू म्हणून ते मानले जात होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोहनसिंग राजपाल नगर सेवक होते. शहराचा मध्यवर्ती पेठांचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९९६-९७ वर्षानंतर २००९ ला महापालिकेचे पुरूष महापौर म्हणून काम करणारे राजपाल हे दुसरे महापौर ठरले होते. तसेच पुणे शहारातील शीख समाजाचे ते पहिले महापौर होते. पुणे महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना २००९ ते २०१२ या अडीच वर्षांसाठी राजपाल यांनी महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
2020 मध्ये मोहनसिंग राजपाल यांच्या पत्नी जसबीरकौर राजपाल (Jasbirkaur Rajpal) यांचे निधन झाले होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून मोहनसिंग राजपाल देखील आजारी होते. एका खासगी हॉस्पिटलमध्ये शनिवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.