पुणे : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये सोमवारी (ता.२९) सभा होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात अवकाश उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच पॅराग्लायडींग, ड्रोन उडवल्यास त्यांच्यावर कडक कारवाईही करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ आणि ३० एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. २७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ३० एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे शहर परिसरात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८ च्या दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई होणार आहे.
दरम्यान, राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. त्यामुळे पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत. यासेच शहरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.