लोणी काळभोर, (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावरील पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोरसह परिसरात शनिवारी (ता.२७) पहाटे पाच वाजल्यापासून ऐअरटेल या कंपनीच्या मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ग्राहक चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. या नेटवर्कसमस्यांमुळे बँकिंग सेवेवर परिणाम होत आहे.
प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल फोनवर फोन पे, गूगल पे, अमेझॉन पे, भारत पे, पेटीयम यासारख्या डिजिटल व्यवहार करण्यासाठी नेटवर्क नसल्याने ग्राहकांचे व्यवहार खोळंबलेले दिसत आहेत. मोबाईल नेटवर्कमुळे कॉल ड्रॉप होणे, आवाज ऐकायला न येणे, फोन दुसरीकडेच वळवणे, पूर्व हवेलीतील ऐअरटेल या कंपनीची सेवा विस्कळीत झाली आहे.
सध्या पूर्व हवेलीतील सर्वच भागात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता टॉवरची संख्या कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. कॉल ड्रॉप आणि रेंज प्रॉब्लेम या समस्यामुळे एअरटेल कंपनीचे ग्राहक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.