छत्रपती संभाजीनगर : तरुणाचे लग्न झालेले आहे, हे कळाल्यानंतर तरुणीने त्याच्यासोबत चार वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध तोडले. याचा राग आल्याने तरुणाने सतत तिचा पाठलाग करत तिला रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी धमकावल्याची घटना सिडको एन-६ परिसरात घडली. याप्रकरणी सिडको पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन संपत चव्हाण (रा. पोरगाव तांडा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. सचिनचे तरुणीसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याने त्याचे लग्न झाल्याचे तिच्यापासून लपवून ठेवले होते.
अखेर तिला त्याच्या लग्नाची माहिती समजली. त्यानंतर तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडले. याचा राग सचिनला आला. त्याने १४ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत तिचा सतत पाठलाग करत, रिलेशनशिप कायम ठेवण्याचा तगादा लावला. त्यासाठी मानसिक दबाव आणत तिला धमकावले. अखेर तरुणीने २४ एप्रिल रोजी सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस हवालदार शिंगणे करीत आहेत.