पुणे : येथील भावाच्या खुनाचे फोटो, व्हिडिओ हे सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्यामुळे मित्रांसोबत मिळून 18 वर्षीय तरुणाचा खून केला आहे. त्यानंतर दृश्यम चित्रपट स्टाईलने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नेऊन जाळणा-या संशयिताला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. खून झालेल्या तरुणाचे नाव आदित्य युवराज भांगरे (वय-18 रा. भांगरे वस्ती, महाळुंगे ता. खेड) आहे. तर अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव राहुल संजय पवार (वय-34 रा. महाळुंगे इंगळे ता. खेड) आहे.
गुन्ह्यातील मुख्य आरोपी राहुल पवार हा फरार झाला होता. त्याने ओळख लपवण्यासाठी मोबाईलचा वापर टाळत होता. त्याने डोक्यावरील केस व दाढी मिशा काढल्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्या संपर्कातील 67 जणांकडे चौकशी केली. आणि तो वावरत असलेल्या नाशिक फाटा व कासारवाडी भागातील दुकाने, चौक व मेट्रो स्टेशन येथील 124 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते.
गुंडा विरोधी पथकाला आरोपी राहुल पवार हा औंध परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. आरोपी रिक्षामध्ये येऊन थांबला असता त्याला घेराव घालून ताब्यात घेण्यात आले. त्याने त्याचा पेहराव बदलला होता. त्याने त्याचे सागर संजय मोरे (रा. आळंदी) असे खोटे नाव सांगितले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने राहुल संजय पवार असे नाव सांगितले.गुन्हा झाल्यानंतर आरोपी एक महिना फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर गुंडा विरोधी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.