लोणी काळभोर : “हिवतापाविरुद्धच्या आपल्या सामुहिक लढाईत आणि वर्ष 2030 पर्यंत देशाला संपूर्णपणे हिवतापमुक्त करण्याचे आपले ध्येय साध्य करण्यात केवळ निदान आणि उपचारच नव्हे तर स्वतःची आणि आपल्या परिसरातील स्वच्छता तसेच हिवताप नियंत्रण आणि प्रतिबंध याबाबतची सामाजिक जागरुकता तेवढीच महत्त्वाची आहे” असे प्रतिपादन, आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी केले.
लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन २०२४ निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी हिवताप विषयी फलक लावून जनजागृती करण्यात आली. यामध्ये आरोग्य अधिकारी डॉ. एस एस रोकडे, आरोग्य सहाय्यक रशीद शेख यांचेसमवेत आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. जाधव बोलत होते.
डॉ. जाधव यांनी हिवताप हा आजार ‘प्लासमोडियम’ या परोपजीवी जंतूंपासून होतो. हे जंतू ‘ॲनाफिलस’ मादी डासांद्वारे प्रसारित होतात.
महाराष्ट्रामध्ये हिवतापाच्या जंतूंचे व्हायव्हॅक्स व फॅलसीफेरम हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. मलेरियाच्या जंतूंचा अधिशयन काळ १० ते १२ दिवसांचा आहे. अशी माहिती दिली. तसेच थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो, नंतर घाम येऊन अंग गार पडते, ताप आल्यानंतर डोके अतिशय दुखते, बऱ्याचवेळा उलट्याही होतात. हि हिवतापाची लक्षणे आहेत अशी माहिती दिली.
प्रयोगशाळेत रक्त नमुना तपासणी करून हिवतापाचे खात्रीशीर निदान करता येते. अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतू आढळतात. असे सांगितले. यांसाठी औषधे उपाशीपोटी घेऊ नका, गर्भवती माता, एक वर्षाखालील बालक आणि जी. सिक्स, पी. डी. ची कमतरता असणाऱ्या या रुग्णांना प्रायमाक्विन देऊ नये, औषधोपचार आरोग्य यंत्रणेच्या देखरेखी खाली देणे. असे अवाहन डॉ. जाधव यांनी केले.