गोरख जाधव
बारामती, (पुणे) : डीजेला परवानगी नसताना हॉस्पिटल, शाळा, लोकवस्ती याकडे दुर्लक्ष करून मोठ्याने आवाज वाढवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी डीजे मालकावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 23) रात्री सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रकार घडला आहे.
अजिनाथ नामदेव जगताप (रा. झिरपवाडी ता. फलटण जि. सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डीजे मालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार नवनाथ चांगदेव शेंडगे (वय – 34) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान जंयतीनिमित्त शहर पोलिसांचे पथक परिसरात बंदोबस्तासाठी तैनात होते. यावेळी कदम चौकातील थंडर बाईज तरूण मंडळाचे अध्यक्ष नवनाथ शिंदे यांनी अजिनाथ नामदेव जगताप यांचा माउली फलटणवाला हा डीजे परवानगी नसताना कदम चौक बारामती येथे रस्त्त्यावर आणला होता.
बारामती शहरातील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेले हॉस्पिटल, शाळा, लोकवस्ती याकडे दुर्लक्ष करून मोठ्याने आवाज वाढवून लावला. त्यामूळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याने पोलिसांनी वेळोवळी डीजे थांबविण्याच्या सूचना देऊनही ते न थांबवता डीजे तसाच मोठ्या आवाजात सुरु ठेवला.
दरम्यान, वरील डीजे साऊंड सिस्टीम मालक व चालक अजिनाथ नामदेव जगताप यांच्याविरूध्द पोलीस हवालदार शेंडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.