पुणे : डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी पुण्यातील ४ बांधकाम व्यावसायिकांन कवडीमोल भावानं विकत घेतली आहे. मात्र, ते ठेवीदारांचे पैसे परत करण्यास तयार नाहीत असा गंभीर आरोप डी एस कुलकर्णी यांनी केला आहे. तसेच १६ हजार कोटींच्या माझ्या मालमत्ता अवघ्या ८२६ कोटींना विकत घेतल्याचा आरोप देखील डीएसके यांनी केला आहे. व्ही.टी. पारलेशा, जयंत शहा, अशोक चोरडीया आणि प्रमोद रांका यांनी NCLT मार्फत डीएसके यांच्या मालमत्ता विकत घेतल्या आहेत.
या प्रकाराविरोधात डी एस कुलकर्णी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टानं दहा मेपर्यंत या सर्व मालमत्ता विकण्यास स्थिगिती दिली असल्याची माहिती डीएसके यांनी दिली आहे.
पुढे बोलताना डीएसके म्हणाले, सध्या अंगावरील कपडे सोडता माझ्याकडं काहीच नाही, तसेच माझ्या मालमत्ता तसेच बँक खाती गोठवली आहेत. मी ठेवीदारांचे पैसे परत कसे देऊ असा सवालही डीएसके यांनी केला आहे. २०१७ मध्ये एकाच वेळी मला ३२ हजार जणांनी पैसे मागितले असंही कुलकर्णी म्हणाले. मी आयुष्यात कधीही खोट बोललो नाही. माझ्या जमिनी हडप केल्या आहेत, असा गंभीर आरोप डी एस कुलकर्णी यांनी केला आहे.
माझ्या सर्व मालमत्ता आणि बँकेची खाती गोठवली
मी दिवाळखोर नसून मला गुंतवणुकदारांचे सर्व पैसे परत द्यायचे आहेत, माझ्या सर्व मालमत्ता आणि बँकेची खाती गोठवली आहेत, मला आणखी एक महिन्याचा कालावधी दिला असता, तर सर्व मुद्दे निकाली लागले असते. मी पैसे देत होतो. मात्र, मला द्यायला थोडेचे पैसे कमी पडत होते. मला अटक होण्याआधी सर्व बँक खाती गोठवण्यात आली असून माझ्याविरोधात हे सर्व ठरवून केलं असल्याच देखील डी एस कुलकर्णी म्हणाले.