पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांना मारहाण करत पिस्तूलातून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. ही घटना संतोषी माता मंदीरा शेजारील घुंगरुवाला चाळ येथील बांधकामावर २० मार्च रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी कात्रज परिसरातून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
तेजस महादेव खाटपे (वय-२३, रा. राम मंदीराशेजारी, जिल्हा परीषद शाळेजवळ, आंबेगाव बु), तुषार धनराज चव्हाण (वय-२४, रा. सच्चाईमाता रोड, आयप्पा स्वामी मंदीराचे मागे, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आकाश पवार, रोहन पवार, तुषार माने, तुषार चव्हाण, दादा चव्हाण, तेजस खाटपे, स्वरुप राठोड, गजानन माने यांची स्वामी नारायण मंदीराजवळ भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आकाश पवार याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच ऋषीकेश बर्डे याला हाताने मारहाण केली.
दरम्यान, आरोपी रोहन पवार याने पिस्टल काढून फिर्यादी यांना धमकविण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी रोहन पवार याला मागुन पकडले. त्यावेळी पिस्टलमधुन जमीनीवर गोळी झाडली गेली. त्यानंतर सर्वांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना हाताने मारहाण केली. तर तुषार माने याने लोखंडी हत्याराने फिर्यादी यांच्या डोक्यात आणि हातावर मारुन जखमी केले. यानंतर सर्व आरोपी फरार झाले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलीस अंमलदार विक्रम सावंत आणि राहुल तांबे यांना एका खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, गोळीबार करून खुनाच्या प्रयत्नातील आरोपी तेजस खाटपे व तुषार चव्हाण हे अंजनीनगर कात्रज येथे आले आहेत. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
ही कामगिरी पुणे प्रादेशीक (पश्चिम ) विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, परिमंडळ दोनच्या पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नंदीनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.