पिंपरी-चिंचवड : आळंदी येथे डोक्यात दगड घालून महिलेचा निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी 20 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीवर दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. महिलेने लग्नाचे वचन मोडल्याने तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ज्ञानेश्वर गजानन इंगाले (वय 31, रा. इंद्रायणी घाट, आळंदी देवाची. मूळ रा. कुटी पांगरी, ता. मालेगाव, वाशिम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खून झालेल्या महिलेची ओळख पटली नाही. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर घुले यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांना महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्याने आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला अटक केली. दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
आरोपी इंगाले हा मुळचा वाशिम जिल्ह्यातील आहे. तो कामानिमित्त आळंदी येथे मागील दोन ते अडीच वर्षांपासून वास्तव्यास आहे. इंगाले हा मजुरीचे काम करून आळंदी घाटावरच झोपत असे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून एक महिला देखील आळंदी घाटावर वास्तव्यास आली होती. आरोपी इंगाले याची त्या महिलेसोबत ओळख झाली होती. त्या ओळखीतून दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या निर्णयानंतर सदर महिला ही एका अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना आरोपीला दिसली. त्यामुळे ज्ञानेश्वर इंगाले याने महिलेच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून तिचा निर्घुण खून केला.