रत्नागिरी : लांजा तालुक्यातील आंजणारी नदीत शिंपले शोधण्यासाठी नदीवर गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा खोल डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खोल डोहाचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आंजणारी येथील काजळी नदीत घडली आहे. मनीष नारायण शिंदे (वय २५) आणि प्रमोद नारायण शिंदे (वय २२) अशी या दोन भावांची नावं आहेत. या घटनेनं अंजणारी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आंजणारी नांदिवली गावच्या सीमेवर राहणारे प्रमोद शिंदे आणि मनीष शिंदे हे दुपारी काजळी नदीवर मुळे शोधण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे मामा पांडुरंग धोंडू शिंदे आणि बहीण कल्याणी दिनेश पडियार या देखील होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रमोद शिंदे आणि मनीष शिंदे हे दोघे भाऊ मुळे शोधण्यासाठी काजळी नदीपात्रातील खोल डोहात उतरले.
डोहाचा अंदाज न लागल्याने यातील लहान भाऊ मनीष शिंदे हा बुडाला. मनीष हा डोहात बुडत असल्याचे लक्षात येताच प्रमोद हा त्याला वाचवण्यासाठी गेला. तो देखील डोहात बुडाला. आपले दोन्ही भाचे डोहात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर मामा पांडुरंग शिंदे यांनी आरडाओरडा केला. मात्र, दुर्दैवाने दोन्ही भाऊ नदीतील खोल डोहात बुडाले होते. घटनेची माहिती मिळताच अनेक ग्रामस्थ तसेच लांजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.