पुणे : महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यामध्येच ‘मी’ पणा ठासून भरला आहे. त्यामुळेच ते अजित पवार यांच्यासह इतरांवर टीका करतात, अशी टीका करत शिवाजी आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाजी आढळराव पाटील यांनी आज पिंपरी- चिंचवड येथे पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी ते बोलत होते.
शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, मी कधी थांबायचं हा माझा प्रश्न आहे. मी थांबू नये असा अमोल कोल्हेंचा आग्रह असेल तर आणखी चार निवडणूक लढवतो. अमोल कोल्हे हेच माझ्या बोलण्यावरून भावनिक झाले असतील तर मी पुन्हा लढेन. अमोल कोल्हे हे स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात. त्यांना कोण लिहून देतं हे मला माहीत नाही. अमोल कोल्हेंमध्ये ‘मी’ पणा ठासून भरला आहे. अजित पवारांवर टीका, इतरांवर टीका असं त्यांचं काम सुरू आहे. हा त्यांचा ‘मी’ पणा आहे. हे निवडणूक हातातून निसटल्याचं चिन्ह आहे, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते अमोल कोल्हे?
स्वतःचे मनोधैर्य वाढवण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील दररोज एक मनोरंजक विधान करत आहेत. आढळराव पाटलांनी मी पणा सोडून कधीतरी देशाचा विचार करायला हवा. मतदारांना अशा प्रकारे भावनिक आवाहन करत असतील तर याचा अर्थ उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच ते पराभूत झाले आहेत, अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केली आहे.