योगेश शेंडगे
शिक्रापूर, (पुणे) : शिरूर तालुक्यातील पारोडी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून जियो (Jio) कंपनीचे सिमकार्ड धारकांना व्यवस्थित नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे मोबाईल धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या गावात जिओ कंपनीचे दोन टॉवर असून देखील नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
याआधी या परिसरात बीएसएनएल वापरकर्ते जास्त होते, परंतु बीएसएनएल सिमला नेटवर्क प्रॉब्लेम येत असल्याने या भागातील लोकांनी कंपनी बदलून जिओ मध्ये पोर्ट केले होते. मात्र, आता जिओ सिम वापरताना देखील याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने मोठी नामुष्की मोबाईल धारकांवर आली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, याचप्रमाणे आता मोबाईल हा मूलभूत गरजेपैकी एक झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
नेटवर्कमुळे नागरिक, व्यापारी, ऑनलाइन काम करणारे, इंटरनेट बँकिंग वापरणारे, सुट्टीत ऑनलाइन क्लासेस करणारे शाळकरी विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
वेळोवेळी तक्रार करूनही प्रश्न सुटेना
गडगंज पगारा वर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु हे अधिकारी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधाकडे लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सध्यातरी मोबाईल टॉवर्स शोभेची वस्तू बनले आहे. ग्राहकांची तक्रार किंवा फोनवर सूचना दिली तर त्यांची साधी दखलही घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. लाखो रुपये खर्च करून गावामध्ये नेटवर्क मिळावे यासाठी दोन टॉवर उभे केले आहेत. तरीदेखील प्रश्न सुटत नाही. कधी इंटरनेट काम करत नाही, तर कधी व्हॉइस कॉल होत नाही तर कधी पूर्ण रेंज जाती.
नागरिकांची कंपनीकडे मागणी
ज्याप्रमाणे कंपनी रिचार्ज संपण्याआधीच आपल्या ग्राहकाला सतत कॉल करून रिचार्ज करा अशी आठवण करून देते, त्याचप्रमाणे आपल्या ग्राहकाला योग्य सुविधा मिळत आहे, की नाही याची तपासणी त्यांनी करायला हवी. संबंधित मोबाइल कंपनीने मोबाईल नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी परिसरातील मोबाईल ग्राहक करत आहेत.