पुणे: सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात आणि जिल्ह्यामध्ये कोयता गँगनंतर आता गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशीही गोळीबार झाला आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या चार गोळीबाराच्या घटनांमुळे पुणे शहर हादरले आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पुणे पोलिसांसमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. आता शुक्रवारी जुन्या वादातून पुणे शहरातील येरवडा परिसरात गोळीबार झाला आहे.
जुन्या वादाचा राग मनात ठेवत एकावर तीन गोळ्या झाडल्या आहेत. आकाश चंदाले नावाच्या आरोपीने विकी चंदाले याच्यावर गोळीबार केला आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान येरवडा परिसरातील अग्रेसन स्कूल समोर ही घटना घडली. आरोपी आणि गोळीबार झालेली व्यक्ती हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे.
अशा घडल्या चार गोळीबाराच्या घटना
पहिला गोळीबार हा धीरज दिनेशचंद्र आरगडे या बांधकाम व्यावसायिकावर झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जयवंत खलाटे (रा. गोंधळेनगर, हडपसर) असं दुसऱ्या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुधीर रामचंद्र शेडगे व त्यांचा मुलगा ऋषिकेश शेंडगे (दोघेही रा.शेवाळवाडी, ता. हवेली) असे हडपसर पोलिसांनी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर तिसरा गोळीबार हा गणेश गायकवड (रा. वारजे) यांच्यावर झाल्याची माहिती मिळत आहे. हा गोळीबार माचीस मागितल्याचा कारणातून झाला. आता चौथ्या घटनेत आकाश चंदाले याने विकी चंदाले याच्यावर येरवडा येथे गोळीबार केला आहे.
गुन्हेगारांवर पुणे पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे . बेकायदा पिस्तूले आणि त्यातून होणारे गोळीबार पोलिसांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. तसेच शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. या चार घटना सलग तीन दिवस घडल्याने पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. या चारही घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.