पुणे: मोटासायकलचे नुकसान भरून दिले नसल्याचा राग मनात धरून एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पिंपरी परिसरात २०१२ मध्ये घडली होती. या गुन्ह्यातील ४ आरोपींची तब्बल १२ वर्षानंतर पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती अँड. सर्वेश निकम यांनी दिली आहे.
जाकीर जयनोद्दीन शेख (वय-२८, रा. कुलदीप आंगण, नेहरूनगर, पिंपरी, पुणे), किरण मारूती कांबळे (वय-२४ , रा. विठ्ठनगर, नेहरूनगर, पिंपरी, पुणे.), सलीम ऊर्फ खब्या मकबुल पटेल (वय-२४ रा. राजीव गांधी वसाहत स.नं.१०३ नेहरूनगर पिंपरी) व मनोज म्हसुकांत विटकर (वय-२२, रा. विजयप्रभा हौसींग सोसायटी, साई मंदीराजवळ नेहरूनगर, पिंपरी, पुणे) अशी निर्दोष सुटलेल्यांची नावे आहे. इक्बाल ख्वाजा सैय्यद (वय-३३, विठ्ठलनगर, नेहरूनगर पिंपरी पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण मारुती कांबळे यांच्या मित्राच्या मोटासायकलचे नुकसान भरून दिले नाही म्हणून आरोपींनी इक्बाल ख्वाजा सय्यद व इम्तियाज ख्वाजा सय्यद या दोन भावडांना लवारीने व लाथा-बुक्क्याने मारहाण केली होती. तसेच शिवीगाळ करून जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात आरोपींकडून अँड.विपुल दूशिंग, अँड. प्रकाश चव्हाण आणि अँड. सर्वेश निकम यांनी केलेले युक्तिवाद गाह्य धरून न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने या खटल्यात तब्बल ९ साक्षीदार तपासले. तर सरकार पक्षातर्फे अँड. लीना पाठक यांनी काम पाहिले. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी दिले आहे.