पुणे : पुण्यातील बुधवार पेठेमधील भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला मंगळवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. गणपती मंदिर परिसरातील अरूंद गल्लीत आग लागल्याने परिसरात घबराट पसरली. आगीचे लोट सर्वदूर पोहचले आहेत. ही घटना आज १६ एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळ असलेल्या परिसरात खाद्यपदार्थ, रद्दी, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीची दुकाने आहेत. गणपती मंदिराजवळील एका वाद्याला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाचे सहा बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले.
वाड्याच्या परिसरातील एका दुकानाला आग लागली. लाकडी वाड्याने पेट घेतल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सादर वाड्याला जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.