पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातील तळेगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी तळेगाव येथे घडली आहे. सूरज राजेंद्र रायकर (वय-२८, रा. माळी नगर, तळेगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज याचा आज लग्नसोहळा पार पडणार होता. घरात सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू होती. पाहुणे मंडळी जमा झाली होती. अशातच त्याने सकाळी मामाला फोन केला. “मला लग्न करायचं नाही”, असं सांगून तो घराबाहेर पडला. लग्न करायचं नसल्याने सुरज पहाटे पाच वाजल्यापासून बेपत्ता होता. घरातल्या मंडळींनी सर्वत्र शोधाशोध सुरु केली. मात्र, सुरजचा थांगपत्ता लागला नाही. मात्र, काही वेळानंतर घरापासून जवळच असलेल्या वाण्याचा मळा येथील विहिरीजवळ सुरज याची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना त्याच्या नातेवाईकांनी दिली.
पोलिसांना शंका आल्याने त्यांनी काही स्वयंसेवकांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला. त्यावेळी सुरज याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. त्यानंतर काही तासातच त्याचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला, अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने आत्महत्या केल्याने तळेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहे.