सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची बारावी यादी आज मंगळवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंची कॉलर टाईट झाली आहे.
आता उदयनराजे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात थेट सामना रंगणार आहे.
भाजपा पक्षश्रेष्ठींनी उदयनराजे यांना साताऱ्याच्या जागेचा हट्ट सोडावा असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पक्षश्रेष्ठींचा निरोप घेऊन भाजपने गिरीश महाजन साताऱ्यात येऊन उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंना भेटून गेले. त्यानंतरही उदयनराजे कमळ या चिन्हावर निवडणूक मिळविण्यासाठी अडून राहिल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नाराज होते.
त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागला. उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून समाधान न झाल्याने त्यांनी दिल्लीत धाव घेतली होती. दिल्लीतील अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही उमेदवारी लांबणीवर पडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.
साताऱ्याची जागा अजित पवार गटाने हक्काने मागून घेतली आहे. त्यांचा उमेदवार तयार असतानाही उदयनराजे यांनी शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली. अजित पवार गटाकडून उदयनराजेंना घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे सांगण्यात आले. मात्र उदयनराजे भाजपच्या कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेर महायुतीने त्यांना उमेदवारी जाहीर केली.
दरम्यान, उदयनराजेंना उमेदवारी भाजपाकडून मिळाली तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट शशिकांत शिंदेंना मदत करतील अशी भीती भाजपाला होती. त्यामुळे अजित पवार गट आता उदयनराजेंना समर्थन देतात की शशिकांत शिंदेना मदत करणार हे पाहावं लागणार आहे.