अक्षय टेमगिरे
रांजणगाव (पुणे) : रांजणगाव गणपती (ता. शिरुर, जि. पुणे) गावच्या हद्दीतील पुणे-अहमदनगर हायवेलगत असलेल्या हॉटेल आमराईमधील काउंटरमधून रात्रीच्या वेळी दोन मोबाईल व ३० हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना मुद्देमालासह गजाआड केलं.
याप्रकरणाचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार हे करताना घटनास्थळ व हायवेवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तसेच तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करुन रेहान रमजान लदाफ (वय २०, रा. नुरानी मस्जीद जवळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे), सैद नईम शेख (वय २१, रा. आर. के. चौक, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) या दोघांना अटक करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना मोठे यश आले.
या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी अशाप्रकारचे रांजणगांव पोलीस स्टेशन हद्दीतील तीन घरफोडीचे गुन्हे व मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील एक घरफोडीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधीकारी (शिरुर) प्रशांत ढोले व रांजणगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलीस हवालदार नागरगोजे यांनी केला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गायकवाड, पोलीस हवालदार मोरे हे करत आहेत.