उरुळी कांचन, (पुणे) : हिंगणगाव (ता. हवेली) येथे बिबट्याने एकाच रात्री दोन गोठ्यांवर केलेल्या हल्ल्यात एक वासरू ठार तर एक कालवड जखमी झाले आहे. सोमवारी (ता. १५) पहाटे ही घटना उघडकीस आली. या दोन घटनेत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हनुमंत दत्तात्रय कोतवाल (रा. हिंगणगाव, ता. हवेली) यांच्या गाईच्या गोठ्यात गाई हांबरत होत्या. या गायींच्या आवाजाने कोतवाल यांनी गोठ्यात पाहत असताना बिबट्या त्यांच्या गाईच्या पाच महिन्यांच्या वासरावर हल्ला करताना दिसला. यावेळी त्यांनी काठीचा आवाज केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. यावेळी परिसरातील डॉ. रणजित कोळपे यांच्या गाईच्या गोठ्यात गेला व त्या ठिकाणी असलेल्या दोन महिन्याच्या गाईच्या वासरावर हल्ला केला व वासरू ठार मारले.
उरुळी कांचनसह परिसरातील टिळेकरवाडी, हिंगणवाडी, शिंदेवाडी परिसरात बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे सर्रास दर्शन होत आहे. परिसरात कुत्री, वासरे व शेळ्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु सोमवारी रात्री बिबट्याने हिंगणगाव परिसरात अक्षरशः हैदोस घातला. एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोठ्यांवर हल्ला केला आहे.
लोकवस्तीमध्ये बिबट्याच्या असलेल्या बिनधास्त वावरामुळे शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशातच गोठ्यामध्ये घुसून पाळीव जनावरांवर बिबट्याकडून होणार्या या हल्ल्यामुळे अधिकच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशत निर्माण करणार्या या बिबट्याचा तातडीने वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकर्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, हिंगणगावमधील शेतीपंपाची लाईट ही चार दिवसांची तर चार दिवस रात्रीची असल्यामुळे शेतकरी हा रात्रीचे शेताला पाणी देण्यासाठी घाबरत आहे. तरी वनविभागाने याची दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी करत आहे. मानवी वस्तीतील बिनधास्त वावरासह बिबट्याकडून वारंवार होणार्या या हल्ल्यामुळे लोकांसह शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
जीवितहानी झाल्यावरच पिंजरा लावणार का?
हिंगणगाव व पंचक्रोशीत पशुधनावर बिबट्यांच्या हल्ल्याचे सत्र सुरूच असून, वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून फक्त पंचनामा केला जातो. नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी वारंवार करून देखील वनविभागाने काही पिंजरा लावला नाही. त्यामुळे आता जीवितहानी झाल्यावरच वनविभाग पिंजरा लावणार का?
– माऊली थोरात, सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी, (हिंगणगाव, ता. हवेली)