सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यामधील वाद चांगलाच पेटला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी सातत्याने स्थानिक नेते आग्रह धरत होते. मात्र, ‘मविआ’त ही जागा ठाकरे गटाला देण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘मविआ’मध्ये वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, मविआ सांगली मतदार संघाबाबत निर्णय बदलेल अशी आशा स्थानिक नेत्यांना आहे. त्यासाठी नागपूर येथे काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वी विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणुकीचा अर्ज दाखल केला असून मंगळवारी काँग्रेस जिल्ह्यात मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. त्यानंतर विशाल पाटील आणखी एक अर्ज भरणार आहेत, जो काँग्रेसकडून असेल.
यावेळी विशाल पाटील म्हणाले की, सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहे, तत्पूर्वी आज खरसुंडी येथे आमचे कुलदैवत सिद्धनाथाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सिद्धनाथाची कृपादृष्टी नेहमीच पाठीशी राहिली आहे. येणारा काळ कसोटीचा असला तरी सोबत संघर्षाचा वारसा आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाचे असणारे पाठबळ अगणित ऊर्जा देणारे आहे असं ते म्हणाले.