लोणी काळभोर, (पुणे) : चिकनच्या दरात महिनाभरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या किलोचा दर 240 ते 280 रुपयांवर पोहोचला आहे. वाढत्या उष्म्यामुळे कोबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आणि पिलांची वाढ मंदावल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याची माहिती पोल्ट्रीचालकांनी दिली. तर उष्णतेमुळे मागणी घसरल्याने अंड्याचा दर मात्र उतरला आहे.
मटणाच्या तुलनेत चिकनचा दर निम्म्याहून कमी असल्याने ग्राहकांची त्याला अधिक पसंती आहे. गेल्या महिन्यात किलोचा दर 180 ते 200 रुपये होता. पण वाढत्या उन्हाबरोबर चिकनच्या दराचा आलेखही उंचावत चालला आहे. आज चिकनची किलोला 240 रुपयांनी विक्री केली जात आहे.
दरवर्षीपेक्षा यंदा उन्हाळा प्रचंड आहे. त्याचा फटका व्यवसायाला बसला असून 10 ते 20 टक्के पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. त्यातच कोंबड्यांची पैदासही अपेक्षेइतकी नाही. परिणामी मागणीच्या तुलनेत कोंबड्यांचा पुरवठा कमी होत आहे. यामुळे दर वाढत आहेत. दोन किलोच्या कोंबडीच्या वाढीसाठी लागणारा 30 ते 35 दिवस हा कालावधी 40 ते 45 दिवसांवर पोहोचला आहे. शेकड्यामागे सरासरी 10ते 20 पक्षी उष्म्यामुळे बळी पडत आहेत. या सर्वांचा परिणाम चिकनचा दर वाढण्यावर झाला आहे.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीत बॉयलर कोंबडीचा पुरवठा कमी असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिना सुरू असून, बॉयलर कोंबडीची मागणी जास्त आहे. त्यामुळे चिकन दुकानदारांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत.
चिकन आणखी महागणार
मध्यंतरी चिकनचा दर घसरला होता. पोल्ट्रीतील या मंदीमुळे चार महिन्यांत अनेकांनी पोल्ट्रीमध्ये कोंबड्या ठेवल्याच नाहीत. परिणामी कोंबड्याची पैदास कमी झाली आहे. त्यात रमजानमुळे चिकनचा अधिक उठाव झाला आहे. यामुळे नजीकच्या दिवसांत चिकनच्या दराचा आलेख आणखी उंचावण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
दरवाढीचा शेतकऱ्याला फायदा नाही
चिकनचे दर कंपन्यांनी वाढवले आहेत. या दराचा फायदा कंपन्या, ट्रेडर्स व दुकानदार यांना झाला आहे. शेतकऱ्यांचे खुले
कुक्कुटपालन व्यवसाय 80 टक्के बंद असल्याने दिसून येत आहे. त्यामुळे या वाढलेल्या दराचा पोल्ट्री कुक्कुटपालन
शेतकऱ्याचा कोणताही फायदा अथवा कसलाही संबंध नाही.– नंदू चौधरी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा को-ऑपरेटिव्ह सोसायटी, सोरतापवाडी, ता. हवेली
पक्षांच्या खाद्यांचे रेट वाढले भरमसाठ
वाढत्या उन्हामुळे पक्षांची मरतूक जास्त होत आहे. पक्षांच्या खाद्यांचे रेट भरमसाठ वाढले आहे. ग्रामीण भागात
पाण्याची टंचाई असल्यामुळे पन्नास टक्केपेक्षा जास्त अधिक कुक्कुटपालनाची व्यवसाय बंद आहेत. सध्या सण उत्सव, जत्रा, यात्रा व ऊरूस असल्याने कोंबड्यांची मागणी वाढली आहे. पण पुरवठा अल्प प्रमाणात आहे. वाढीव दराचा फायदा सगुना,
वेंकीज बारामती ॲग्रो व अनेक मोठमोठ्या कंपन्यांना झालेला आहे. मात्र, याचा फटका पोल्ट्री व्यवसायिक, दुकानदार व
ग्राहकांना बसलेला आहे.– किरण काळभोर, पोल्ट्री व्यावसायिक, कदमवाकवस्ती, ता. हवेली
बाजारात जाणवतोय कोंबड्यांचा तुटवडा
बाजारात कोंबड्याचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, ग्राहकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे चढ्या दराने कोंबड्या खरेदी
कराव्या लागत आहेत व याचा चिकन खाणाऱ्या ग्राहकांना फटका बसला आहे. कोंबड्यांची आवक वाढल्यास आपोआपोच चिकनचे दर कमी होतील.– फिरोज काश्मिरी, विक्रेते, साबरीन चिकन सेंटर, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली.