पुणे: खासगी बसमधील वातानुकुलित यंत्रणा बंद पडल्याने ती बस थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या पोलिस शिपायाच्या कानाखाली मारून धक्काबुक्की केल्याची घटना वारजे भागात घडली आहे. याप्रकरणी सदर प्रवासी तरुणाला वारजे पोलिसांकडून अटक करण्यात आली. सुनील तुकाराम दडस (वय २७, रा. टाकेवाडी, ता. माण, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई अमोल सुतकर यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावरून साताऱ्याकडे निघालेल्या प्रवासी बसमधील वातानुकुलित यंत्रणा बंद पडल्याने एक तरुण बससमोर थांबला होता. त्यानुसार वाहतूक कोंडी झाली असून त्याने बस रोखून धरली आहे, अशी माहिती शुक्रवारी (ता. १२) रात्री वारजे पोलिसांना मिळाली होती.
नियंत्रण कक्षाकडे याबाबतची तक्रार आल्यानंतर रात्रपाळीत गस्त घालणारे पोलिस शिपाई अमोल सुतकर आणि सहकारी पवार वारजे पुलावर गेले. त्यांनी प्रवासी तरुण सुनील दडसला समजावून सांगितले, यावेळी दडस याने सुतकर आणि पवार यांना शिवीगाळ करण्यात सुरुवात केली. तसेच पोलीस शिपाई अमोल सुतकर यांच्या कानाखाली मारली. तुमची नोकरी घालवितो, अशी धमकी देखील दिली. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दडसला वारजे पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.