पुणे, ता. 13 : अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करून त्याचा विवस्त्र अवस्थेतील व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या नदीपात्रात घडली.
या प्रकरणी पोलिसांनी अन्सू शर्मा (वय 19, रा. मंडई) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात १६ वर्षीय मुलाच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा आणि तक्रारदार महिलेच्या मुलाचा वाद झाला होता.
महिलेच्या मुलाने मारहाण करण्यास काही जणांना पाठविल्याचा शर्मा याचा समज झाला होता. या कारणावरून शर्मा आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी 16 वर्षीय मुलाला डेक्कन परिसरातील नदीपात्रात नेले. तेथे त्याला पट्टा आणि बांबूने मारहाण केली. नदीपात्रात त्याला विवस्त्र करण्यात आले.
दरम्यान, मोबाईलद्वारे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. तसेच आमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुमच्या समाजाच्या ग्रुपवर क्लिप व्हायरल करण्यात येईल, अशी धमकी आरोपींनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.