बारामती, (पुणे) : बारामती शहरातील जामदार रोड परिसरातील खत्री पवार इस्टेट या वसाहतीत राहणाऱ्या पती-पत्नीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले आहेत. शनिवारी (ता.13) सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली आहे.
सचिन वाघोलीकर व सारिका वाघोलीकर असे मृतदेह सदनिकेमध्ये आढळून आलेल्या दोघांची नावे आहेत. एकाचा गळा व एकाची नस कापलेली आहे. त्यांच्या अंगावर धारधार शास्त्राचे वार दिसून येत आहेत. सदर घटनेचा बारामती शहर पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरु केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाघोलीकर व सारिका वाघोलीकर हे त्यांच्या तीन मुलांसह एकत्रितपणे सदनिकेत राहत होते. घटना घडली तेव्हा ही मुले घरी नव्हती. घटनेनंतर तातडीने पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, बारामती शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या माहिती घेण्याचे काम सुरू असून ही घटना खून, घातपात की आत्महत्या आहे, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपासाच्या दृष्टीने पोलीस अधिकारी व कर्मचारी आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. ठसे तज्ञ तसेच श्वान पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.