बुलढाणा : शुक्रवार १२ एप्रिल रोजी लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आलेल्या सिंदखेडराजा येथील तहसिलदार सचिन शंकरलाल जैस्वाल यांच्या निवासस्थानी तब्बल ४६ लाखांची रोकड सापडली आहे.
शुक्रवारी तहसीलदार जैस्वाल, शिपाई पंजाब ताठे आणि चालक मंगेश कुलथे यांना पाच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर लाचलुचपत विभाग (एसीबी)च्या कर्मचाऱ्यांनी जैस्वाल यांच्या सिंदखेडराजा येथील शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली. या झडतीत नोटांचे ढीगच एसीबीच्या हाती लागले. यामध्ये तब्बल ३७ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम मिळून आली. तसेच जैस्वाल यांच्या परभणी येथील घराची एसीबीकडून घेतल्यानंतर तिथे देखील ९ लाख ४० हजाराची रक्कम मिळाली.
या प्रकरणातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. अवैधरित्या वाळू वाहतुक करण्यासाठी त्यांच्याकडे ३५ हजारच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर विभागाने ही कारवाई केली. जैस्वाल यांच्याकडे मिळून आलेली रक्कम जप्त करण्यात आली असून त्यांच्याकडील इतर मालमत्तांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.