पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. अतुल देशमुख यांच्याकडे शिरूर लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाच्या समन्वयक पदाची जबाबदारी होती. आता राजीनामा दिल्यानंतर अतुल देशमुख आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. अतुल देशमुखयांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, बाजारसमिती संचालक, सरपंच आणि सदस्य यांचा आज पक्ष प्रवेश होणार आहे.
शिरूर निवडणुकीत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणे म्हणजे यश मिळाले तर माझे आणि अपयश आलं की अतुल देशमुख यांचे अशी सध्याची परिस्थिती आहे. तसेच आमदार मोहिते पाटील यांच्याशी असलेल्या संघर्षामध्ये काम करणं आपल्याला शक्य नाही, म्हणून म्हणून राजीनामा दिला आहे, असं अतुल देशमुख यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतरच देशमुख यांनी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान अतुल देशमुख यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याचा फायदा हा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना होऊ शकतो. तर, दुसरीकडे या मतदारसंघात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी महिनाभरापूर्वीच शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अतुल देशमुख यांच्या या निर्णयाचा फटका आढळराव पाटील बसण्याची शक्यता आहे.