पुणे : पिंपरी चिंचवडमधील एका ऑटोमोबाईल कंपनीच्या कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या समोस्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि दगड आढळून आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कंपनीने ज्याचे टेंडर रद्द केले होते, त्याने व्यवसाय आणि कंपनीवरचा राग काढण्यासाठी हा प्रकार केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी तपास करताना पिंपरी चिंचवड पोलिसांना असे आढळून आले की, खाद्यपदार्थात कंडोम आणि दगड हे जाणीवपूर्वक मिसळले गेले होते. आरोपी हा अगोदर कँटिनला खाद्यपदार्थ पुरवत होता. मात्र, कॅटरिंगमध्ये तक्रार आल्याने त्याला परत कंत्राट दिले नव्हते.
पोलिसांनी पुढे सांगितले की, हे प्रकरण २७ मार्चला समोर आले. जेव्हा कँटिनमध्ये कर्मचारी समोसा खात होते, तेव्हा त्यामध्ये कंडोम, गुटखा, पान मसाला आणि काही दगड आढळून आले. त्यानंतर कॅटरिंग कंपनीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली असून चौकशी केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला बेड्या ठोकल्या आहेत. कॅटरिंगच्या ठेकेदाराने एका दुकानदाराला समोसे पुरवण्यासाठी ठेका दिला होता. पण कर्मचाऱ्यांमधून त्याच्याबद्दल तक्रारी आल्यानंतर त्याचे टेंडर रद्द करण्यात आले. त्याचे कंत्राट दुसऱ्याला दिल्याने तो दुकानदार चिडला. त्याने हा राग काढण्यासाठी समोस्यात वरील सर्व गोष्टी मिसळून बदनामीचा प्रयत्न केला.