पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याला वाहतूक पोलिसांनी दणका देत मोठी कारवाई केली आहे. निलेश घायवळ हा आपल्या दहा ते पंधरा साथीदारांसह तीन आलिशान गाड्यांमधून नगर रस्त्याने जात होता. यावेळी निलेश घायवळच्या गाड्या अडवत त्याला गाडीच्या काळ्या काचा काढायला लावल्या. त्याच्याकडून फॅन्सी नंबर प्लेट व काळ्या काचा लावल्याप्रकरणी तब्बल सहा हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला. नगर रोडवरील खराडी येथे मंगळवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईमुळे चिडलेल्या निलेश घायवळने पोलिसांशी हुजत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी त्याला चांगलाच पोलीस खाक्या दाखवीत दंडात्मक कारवाई केली.
मंगळवार नऊ एप्रिल रोजी सकाळी निलेश घायवळ त्याच्या साथीदारांसह खराडी परिसरातून जात होता. यावेळी घायवळ सोबत जवळपास १५ साथीदार होते. हे सर्वजण तीन आलिशान गाड्यांमधून निघाले होते. यावेळी वाहतूक पोलीस जड वाहनांवर कारवाई करीत होते. पोलिसांनी काही गाड्या थांबवलेल्या होत्या आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू होती. यावेळी त्या ठिकाणहून काळ्या काचा लावलेल्या तीन गाड्या असताना पोलिसांच्या निदर्शनास आल्या असता या गाड्या बाजूला घेण्यास सांगण्यात आले.
या गाड्या थांबावल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे आणि त्यांच्या पथकाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली. यावेळी घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना घाई असून लवकर जायचे असल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांनी कोणत्याही दबावाला बाली न पडता त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. फॅन्सी नंबर प्लेट लावणे आणि काळ्या काचा बसविणे याप्रकरणी तब्बल सहा हजार रुपयांचा दंड निलेश घायवळकडून वसूल करण्यात आला आहे.