उरुळी कांचन : स्मशानभूमीत रात्री सहसा कोणी जात नाही. कारण, तिथं रात्री भुतांचं वास्तव्य असतं, असा अंधविश्वास आहे. मात्र, हीच भीती मोडण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. रात्री स्मशानभूमीत भुते नसतात हेच दाखविण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी अख्खी रात्रच स्मशानभूमीत काढली.
भवरापूर ग्रामपंचायतच्या सहकार्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेने स्मशान भेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उरुळी कांचनजवळील भवरापूर गावच्या स्मशानभूमीत अंनिसच्या ५० कार्यकर्त्यांनी हा उपक्रम नुकताच राबवला. हे सर्व कार्यकर्ते स्मशानभूमीतच मुक्कामी राहिले. या कार्यकर्त्यांनी तिथे जेवण केले, तिथली स्वच्छताही केली. स्मशानात अतृप्त आत्मे हे भुताच्या स्वरूपात भटकतात आणि त्यांचा पांढरा वेश, उलटे पाय, उंच शरीरयष्टी असते, हा समज काही खरा ठरला नाही. हे करत असताना स्मशानभूमीत ना त्यांना भूतं दिसली ना त्याच्या अस्तित्वाचा अभास झाला.
याबाबत अंनिसचे विशाल विमल म्हणाले, ‘एका पिढीकडून पुढच्या पिढीच्या मनावर अनेक माध्यमांद्वारे भूत असल्याचे कल्पना रंगवून संस्कार केले जातात. मानसिक अनारोग्य व इंद्रियजन्य भ्रमातून भूत असल्याचे भास निर्माण होतात. त्यामुळे आजही समाजात भुताची कल्पना जनमानसाच्या मानगुटीवर बसली आहे. त्यातून अंधश्रद्धा, भीती, शोषण, मानसिक ताण, फसवणूक घडत आहे’.