नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. बीआरएस नेत्या के. कविता यांनी अंतरिम जामीनासाठी केलेला अर्ज राऊस अव्हेन्यू कोर्टाने सोमवारी फेटाळला.
दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्या के. कविता यांनी अंतरिम जामीन मंजूर करण्याची विनंती गुरुवारी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात केली होती. त्यांनी आपल्या याचिकेत दावा केला होता की, त्यांच्या16 वर्षांच्या मुलाची परीक्षा आहे आणि त्याला त्याच्या आईच्या “नैतिक आणि भावनिक आधाराची” गरज आहे.
अलीकडेच, विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या कोर्टाने के. कविता आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तर्फे हजर असलेल्या वकिलाचा युक्तिवाद ऐकला आणि आपला निर्णय राखून ठेवला होता. सुनावणी दरम्यान, वरिष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी बीआरएस नेत्याची बाजू मांडताना दावा केला की, आईची अनुपस्थिती वडील, बहीण किंवा भाऊ पूर्ण करू शकत नाही.
के. कविता यांचे वकील सिंघवी म्हणाले होते, ‘या प्रकरणातील आरोपी महिलेला एक मूल आहे. ज्यांच्या परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहेत. मूल लहान आहे, असे नाही. तो सोळा वर्षांचा आहे. हे प्रकरण वेगळे आहे. हा आईच्या नैतिक आणि भावनिक आधाराचा मुद्दा आहे.
कविता यांनी या खटल्यातील पुरावे नष्ट केले आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकला, असा दावा करत ईडीने याचिकेला विरोध केला होता. ईडीच्या वकिलाने न्यायाधीशांना सांगितले, ‘आरोपी’ हा लाच देणाऱ्या पहिल्या लोकांपैकी एक आहे. आम्ही केवळ स्टेटमेंटवर अवलंबून नाही. आमच्याकडे साहित्य, व्हॉट्सॲप आणि इतर कागदपत्रांचा पुरावा आहे.
गेल्या मंगळवारी येथील न्यायालयाने के. कविता यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. बीआरएसच्या 46 वर्षीय नेत्याला केंद्रीय तपास यंत्रणेने 15 मार्च रोजी अटक केली होती. एजन्सीने असेही आरोप केले की, कविता या ‘दक्षिण ग्रुप’ची प्रमुख सदस्य होती, ज्यावर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाला (आप) 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे.