मंगळवेढा : भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता विश्वासघात केला आहे. हे लोक सत्तेसाठी प्रचंड खोटं बोलतात. त्याचा परिणामी आज सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत असल्याची टीका सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. प्रणिती शिंदे या शनिवारी मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, २०१४ ते २०१९ या काळात भाजपने काहीच काम केले नाही. तरी २०१९ ला ते आपल्याला मते मागायला आले. त्यावेळी देखील आपण विश्वासाने त्यांना निवडून दिले. मात्र त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही यांनी फसव्या आश्वासनाशिवाय काहीच काम केले नाही. हीच वस्तुस्थिती सांगायला आम्ही आलो आहोत. या वेळेस भाजपच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले. तसेच पाणीप्रश्न, महागाई, बेरोजगारी, जीएसटी या विषयावरून देखील शिंदे यांनी भाजप सरकारला धारेवर धरले.
मोदी सरकारच्या काळात सर्वात जास्त हाल शेतकऱ्यांचे झाले आहेत. दुधाला दर नाही, कांद्याला दर नाही. कांद्यावर निर्यात बंदी लागू केली, सद्यस्थितीत पाणीटंचाईचा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. वीज पुरवठा सुरळीत नाही. खतांचे दर वाढलेत. महागाईने उच्चांक गाठला आहे. म्हणजेच या सरकारने केवळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी आज खोमनाळ, फटेवाडी, तळसंगी, भालेवाडी, डोणज, नंदूर, आरळी, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, बोरागे, सिद्धापूर, माचणूर, ब्रम्हपूरी, या गावांना भेटी दिल्या. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, शिवाजीराव काळुंगे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने, महिला तालुका प्रमूख नंदा ओमने, महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख क्रांती दत्तू, आदि उपस्थित होते.