राहुलकुमार अवचट
यवत : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारानिमित्त दौंड येथे शुक्रवारी (दि.५) महायुतीतील घटकपक्षांची बैठक झाली. यामध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले.
देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीने ‘अबकी बार ४०० पार’चा नारा दिला असून, यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश असेल, असा विश्वास व्यक्त केला. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे आमदार कुल यांनी सांगितले.
या बैठकीला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, योगेश कटारिया, दौंड शुगरचे वीरधवल जगदाळे, रोहित कांबळे, अमित सोनवणे यांच्यासह भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (A),रासप यांसह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.