कोल्हापूर : ‘लिव्ह इन’चा पर्याय कुटुंबीयांना न आवडल्याने बेदम मारहाणीत तरुणीचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. मुलीचा चार महिन्यांपूर्वी साखरपुडा केल्यानंतर लग्नास नकार देऊन मित्रासोबत ‘लिव्ह इन’मध्येच राहणार असल्याचा निर्णय मुलीने घेतला. संतापलेल्या आई, भाऊ आणि मामाने मुलीला रात्रभर बेदम मारहाण केली, या मारहाणीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीची आई, भाऊ आणि मामाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
वैष्णवी लक्ष्मीकांत पवार (वय 24 रा. केदारलिंग प्लाझा, शनिवार पेठ, कोल्हापूर) असं मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील देवठाणेमध्ये घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, उच्चशिक्षित असलेली वैष्णवी एका बँकेमध्ये नोकरीला होती. तिच्या मनमिळावू स्वभावामुळे तिच्या मित्रांमध्ये चांगलीच परिचित होती. ती एका ढोल ताशा पथकाची सदस्यसुद्धा होती. मात्र ती काही दिवसांपूर्वी नोकरी सोडून पुण्यामध्ये एका मित्रासोबत राहत असल्याची माहिती आईला मिळाली. त्यामुळे विचारणा केल्यानंतर मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहणार असल्याची माहिती तिने आईला दिली. मात्र, आईला तिचा लिव्ह इनचा पर्याय पटत नसल्याने त्यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता.
दरम्यान, दोघांना वेगळे करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील देवठाणेमध्ये वैष्णवीला घेऊन जात आई शुभांगी पवार, भाऊ श्रीधर पवार आणि मामा संतोष आडसूळ या तिघांनी रात्रभर काठी, गज आणि दोरीने बेदम मारहाण केली. त्यामुळे तिच्या शरीरावर रक्त साखळल्याने रात्रभर तळमळत होती. तिच्या हात, पायावर गंभीर दुखापत झाली होती. सकाळी पोटात दुखू लागल्याने वैष्णवी बेशुद्ध झाली. तिला दसरा चौकात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी तरुणीची आई, भाऊ आणि मामा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.