नवी दिल्ली: नवनीत राणा या अमरावतीच्या अपक्ष खासदार आहेत. यावेळी त्यांना महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने तिकीट दिले आहे. त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे उमेदवारी मिळाल्यानंतर त्या अमरावतीमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. यंदा काहीही झालं तरी मीच निवडून येणार, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. असे असतानाच सर्वोच्च न्यायालय आज त्यांच्या जात प्रमाणपत्राविषयी निर्णय दिला आहे. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, मुंबई हायकोर्टाने 8 जून 2021 रोजी खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. त्याचबरोबर त्यांना न्यायालयाने दोन लाख रुपयांचा आर्थिक दंडदेखील ठोठावला होता. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनिल भालेराव या दोन नेत्यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणाऱ्या याचिका 2017 मध्ये दाखल केल्या होत्या. खासदार राणा यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र हे बोगस आहे. तसेच जात प्रमाणपत्र समितीसमोरही नवनीत राणा यांनी खोटा जातीचा दाखला दिलेला आहे, असा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला होता.