पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. सु्प्रिया सुळे यांची लढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार असल्याचे मानले जात आहे. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना शिरुरमधून दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्याशी लढत होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.
शिरुरमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. उमेदवारी देऊन विश्वास दाखवल्याबद्दल कोल्हे यांनी शरद पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे सुद्धा आभार मानले आहेत. यावेळी कोल्हे म्हणाले, 2019 मध्ये माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर गेली पाच वर्षाच्या सातत्याने लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न मांडत राहिलो. त्यातील काही प्रश्नांची सोडवणूक करू शकलो. मला वाटतं की, हा पुन्हा शरद पवार यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला आहे, हा विश्वास सार्थ करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन, असं अमोल कोल्हे यांनी सांगितले.