धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गाढ झोपेत असलेल्या १० वर्षीय मुलाला सावत्र आईने उचलून नेत पाण्याच्या हौदात बुडवून खून केला आहे. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना १० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात सावत्र आईच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत निर्दयी आईला अटक केली आहे. शिवमल्हार दयानंद घोडके (वय १० वर्ष) असं मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, नळदुर्ग शहरातील शिवमल्हार हा २८ मार्च रोजी रात्री त्यांच्या घरासमोरील ज्योर्तिलिंग ज्वेलर्स दुकानासमोर त्याच्या वडिलांबरोबर झोपला होता. सकाळी त्याच्या वडिलांना झोपलेल्या ठिकाणी शिवमल्हार दिसला नाही. त्याच्या वडीलांनी व नातेवाईकांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला असता त्यांच्या घराजवळील बांधकाम चालू असलेल्या हौदात त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलीस ठाणे नळदुर्ग येथे अपघाती मृत्यू म्हणून सुरूवाातीला नोंद घेण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदशर्नाखाली या गुन्ह्याचा तपास करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार यांना गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झाले की, शिवमल्हार दयानंद घोडके याचा त्याची सावत्र आई सुंदरबाई दयानंद घोडके यांनी खून केला.
कौटुंबिक वादातून शिवमल्हार हा झोपेत असताना त्याला उचलून नेवून शेजारील पाण्याच्या हौदात बूडवून ठार मारले आहे. आरोपी आईला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी आईवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.