पुणे : घराच्या उताऱ्यात दुरुस्ती करुन देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना पुणे जिल्ह्यामधील वेल्हा तालुक्यातील वरसगावच्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले. विठ्ठल वामन घाडगे (वय ४४, रा. वरसगाव, वेल्हा) असे लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव आहे.
तक्रारदार यांचे वेल्हा तालुक्यात वरसगाव येथे वडिलोपार्जित घर आहे. या मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदीत दुरुस्त करुन घराच्या ८ उताऱ्यावर तक्रारदार यांचे नाव दुरुस्ती आणि त्यांच्या आईचे नाव लावण्यासाठी ग्रामपंचायतीत रीतसर अर्ज केला होता. यासाठी ग्रामसेवक विठ्ठल घाडगे याने त्यांच्याकडे पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदर तक्रारीची पडताळणी बुधवारी करण्यात आली. कर्वेनगरमधील मातोश्री वृद्धाश्रमाजवळ घाडगे याने तक्रारदाराला बोलावले होते. तिथे तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने घाडगे याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण अधिक तपास करीत आहेत.