लोणी काळभोर, (पुणे) : विविध रंगी फुलांनी सजलेले अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथे संकष्टी चतुर्थीला श्री चिंतामणी मंदिरात गुरुवारी (ता. २८) भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने गुरुवारी पहाटेपासूनच “गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया”च्या जयघोषात चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते.
राजेंद्र आगलावे यांच्या हस्ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ‘श्रीं’ ची पूजा केली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने महापूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. चिंचवड देवस्थान व आगलावे बंधू यांच्या वतीने मंदिराच्या प्रांगणात मंडप घालण्यात आला होता. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच उपवासाच्या खिचडी व चिवड्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते.
दरम्यान, थेऊर परिसरात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळी यांच्या साथीने संजय महाराज कावळे (आळंदी देवाची) यांचे सुभाष्य कीर्तन झाले. तसेच चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वांवर देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस लक्ष ठेवून होते.