योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर दोन महिला रस्त्याच्या कडेला उभ्या असताना चारचाकी गाडीची धडक बसली. यामध्ये एका ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे.
याबाबत मेघा राजाराम फंड, (वय 40) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. या अपघातानंतर वाहनचालक महेश वसंत वाळके (रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरूर, जि. पुणे) हा पळून गेला. रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बाभुळसर खुर्द गावच्या हद्दीत बाभुळसर ते रांजणगावकडे जाणाऱ्या डांबरी रोडच्या कडेला साईडपट्टीवर फिर्यादी मेघा फंड आणि त्यांची बहीण मिना रवी घेमुड (वय 42, रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघी उभ्या असताना महेश वसंत वाळके (रा. बाभुळसर खुर्द) याने त्याच्याकडील पांढ-या रंगाच्या चारचाकीने (MH12VV7575) मिना घेमुड यांना धडक देऊन अपघात केला. त्यानंतर त्यांना तातडीने मदतीची गरज असताना अपघाताची खबर न देता पळुन गेला.
या अपघातात मिना घेमुड यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. वाहनचालक महेश वसंत वाळके याच्या विरुध्द रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करत आहेत.