पुणे : महाविद्यालयाच्या वसतिगृहात झोपलेल्या तरुणाच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन ओतून, पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. संबंधित तरुणाला दाह असह्य झाल्याने त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खोलीच्या दरवाजाला बाहेरून कडी लावल्याचे आढळून आले. रेंजहिल्स भागात ही घटना घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत आशिषकुमार नरेंद्रकुमार दास (वय २४, रा. सिंबायोसिस बॉईज हॉस्टेल, रेंजहिल्स) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्याने खोडसाळपणे आशिषकुमारच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन ओतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण रेंजहिल्स परिसरातील सिंबायोसिस बॉईज हॉस्टेलमध्ये राहत आहे. शनिवारी (ता. २३) तो वसतिगृहातील खोलीत झोपला होता. त्यावेळी एकजण वसतिगृहातील खोलीत शिरला. त्याने प्लास्टिकच्या मगमध्ये ॲसिडसदृश रसायन भरले. झोपेत असलेल्या आशिषकुमारच्या अंगावर रसायन फेकून तो पसार झाला. रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे झोपेत असलेला आशिषकुमार खडबडून जागा झाला. अंगावर रसायन ओतल्याने त्याला दाह असह्य होत होता. त्याने आरडाओरडा केला. मात्र, संबंधित व्यक्तीने दरवाजाला बाहेरून कडी लावल्यामुळे खोलीबाहेर पडण्यास अडचण निर्माण झाली.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रूईकर करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वसतिगृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.