शिरूर (पुणे) : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबूराव नगर परिसरात झालेल्या युवकाच्या खून प्रकरणी फिर्याद देणारा चुलत भाऊच खुनी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शिरूर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास लावत आरोपीला जेरबंद केले आहे.
मासुम समिद आलम (मुहम्मद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खून करण्यामागील नेमके कारण काय, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर -पुणे रोडवर श्री गणेशा हॉस्पिटलच्या शेजारी भैरवनाथ कृपा सहकारी गृहरचना मर्यादित, शिरुर या ठिकाणी काही परराज्यातील युवक एकत्रित राहत होते. त्यामधील मोहताब शाहिद आलम या युवकाचा सोमवारी (ता. १८) गळा चिरुन खून झाल्याची घटना घडली होती.
शिरूर पोलिसांनी घटनेच्या तपासाची चक्रे फिरवून, तांत्रिक विश्लेषण करून फिर्यादी मृताचा चुलत भाऊ मासुम समिद आलम (मुहम्मद) हाच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकू, आरोपीच्या बनियनवर आढळलेले रक्ताचे डाग, बर्मुडा चाकूसह गुंडाळून आरोपीने तो बिल्डींगच्या लिफ्टच्या डकमध्ये टाकून दिला होता.
दरम्यान, तपास करीत असताना तो पोलिसांना आढळून आला. या घटनेत भाऊच भावाचा वैरी निघाला. हा खून कशासाठी केला, याचा तपास शिरूर पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस नाईक नाथा जगताप, बाळू भवर, पोलीस हवालदार नितीन सुद्रिक, पोलीस अंमलदार रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात यांच्या पथकाने केली.