पुणे : कौटुंबिक वादातून दाजीने मेव्हण्याचा खून करण्यासाठी मध्यप्रदेशातील पैलवानांना ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेत आरोपींनी केलेल्या हल्ल्यात ३१ वर्षीय मेव्हणा गंभीर जखमी झाला आहे.
अश्विनीकुमार शेषराव पाटील (वय ५२, रा. कमलनिवास, संतोष बेकरीजवळ, आपटे रस्ता) असे सुपारी देणाऱ्या दाजीचे नाव आहे. त्याने महेश महादेव ठोंबरे (वय २८, रा. जुना बस स्टॉप संगमवाडी) आणि फैजल खान (रा. मध्य प्रदेश) आणि आणखी दोघांना खून करण्याची सुपारी दिली होती. याबाबत ३१ वर्षीय मेव्हण्याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ४) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपले हॉटेल बंद करून घरी जात होते. त्यावेळी दोघांनी पत्ता विचारण्याचा बहाण्याने त्यांच्या तोंडावर मिरची टाकली व हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एक मधील पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, महेश बामगुडे, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, नीलेश साबळे करत होते. त्यांनी घटनास्थळापासून विविध ठिकाणी जाणाऱ्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज पाहून संशयित आरोपी ठोंबरे याला ताब्यात घेतले.
अधिक तपास केला असता त्यांना फिर्यादी यांच्या दाजीच्या सांगण्यावरून ५० हजार रुपयांची सुपारी देवून फैजल खान आणि त्यांच्या दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना दिली. महेश ठोंबरे याने दिलेल्या माहितीच्या आधारे पाटील याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ठोंबरे आणि फैजल खान यांनी पाटील यांच्या सांगण्यावरून पूर्व नियोजित कट रचून हा गुन्हा केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, शुभम देसाई, नीलेश साबळे, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, अय्याज दड्डीकर, अभिनव लडकत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.